Pimpri: शहरातील गृहसंस्थांमध्ये निवडणुकीचा बिगुल; सभासदांच्या गाठीभेटींना वेग

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

रावेत – पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध गृहसंस्थांमध्ये सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच प्रत्येक सोसायटीमध्ये चर्चांना उधाण आले आहे. सभासदांच्या गाठीभेटी, चर्चा, मतमतांतरे आणि रणनीतींची सुरुवात झाली आहे. एकीकडे सध्याचे पदाधिकारी पुन्हा एकदा सभासदांचा विश्वास संपादन करण्यासाठी मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे नव्या चेहऱ्यांनी बदल, पारदर्शकता आणि विकासाचा नारा दिला आहे.

गेल्या काही वर्षांतील समितींच्या कामकाजावर सभासद आता बारकाईने नजर ठेवून आहेत. देखभाल निधीचा वापर, पाणीपुरवठा, सुरक्षा, स्वच्छता, पार्किंग, लिफ्ट देखभाल, तसेच सोसायटीच्या सामान्य सभांतील पारदर्शकता या सर्व मुद्द्यांवरून सदस्य आता आपला निर्णय ठरवत आहेत. काही सोसायट्यांमध्ये समितीने उत्कृष्ट काम केल्याने पुन्हा त्यांच्या बाजूने कल दिसतो आहे, तर काही ठिकाणी असमाधानामुळे बदलाची लाटही दिसत आहे. उमेदवारांकडून प्रचार मोहीमेस वेग आला आहे.

काही ठिकाणी घराघरांत जाऊन सभासदांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. काही ठिकाणी सभांद्वारे आपले कार्य आणि भविष्यातील योजना मांडल्या जात आहेत, तर आधुनिक पद्धतीने सोशल मीडियावरून प्रचार सुरू आहे. काही उमेदवार सहकार्य, पारदर्शकता आणि विकास या घोषवाक्यांसह मैदानात उतरले आहेत, तर काहींनी नव्या विचारांचा, नव्या पिढीचा असा संदेश देऊन तरुण सभासदांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अनेक सोसायट्यांमध्ये निवडणुका मैत्रीपूर्ण आणि सुसंवादाच्या वातावरणात पार पडत आहेत. मात्र, काही ठिकाणी गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि मतभेदही प्रकर्षाने जाणवत आहेत. अशा ठिकाणी निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे. तरीही बहुतांश ठिकाणी सभासद लोकशाही प्रक्रियेचा आदर ठेवून एकमेकांशी सभ्यतेने संवाद साधत आहेत.

गृहसंस्था निवडणुका म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर सामूहिक जबाबदारी आणि लोकशाहीतील सहभागाचा एक सुंदर उत्सव आहे. या निवडणुकांमधून सभासदांना आपल्या सोसायटीच्या व्यवस्थापनावर थेट नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते. कोणती समिती सभासदांच्या हिताचे रक्षण करेल, निधीचा योग्य वापर करेल आणि सोसायटीच्या विकासाला गती देईल, हे ठरवण्याची ही योग्य वेळ आहे.

जबाबदारीची निवडणूक
आगामी काही दिवसांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर निकाल लागल्यानंतर कोणाची बाजी लागते आणि कोण सभासदांचा विश्वास संपादन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गृहसंस्थांमधील ही निवडणूक फक्त पदांची नाही, तर जबाबदारीची आणि विश्वासाची लढत आहे. या प्रक्रियेतून पुढे येणारी समिती सोसायटीच्या विकासासाठी नवा मार्ग आखेल, अशी अपेक्षा सर्व सभासदांकडून आहे.

‘गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ आणि गृहसंस्था निवडणूक नियम २०१४ नुसार पार पाडण्यात येतात. या निवडणुकांमध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि सभासदांचा सक्रिय सहभाग हे अत्यावश्यक घटक आहेत. राज्य सहकार विभाग व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली सर्व प्रक्रिया राबवण्यात येत आहे.’ – अबोली पिसाळ, गृहसंस्था निवडणूक निर्णय अधिकारी.

The post Pimpri: शहरातील गृहसंस्थांमध्ये निवडणुकीचा बिगुल; सभासदांच्या गाठीभेटींना वेग appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!