Indapur Politics : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहणार की भाजप गड जिंकणार? इंदापूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर ( नीलकंठ मोहिते ) – इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची औपचारिक सुरुवात सोमवारी (दि. 10 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेसह होत असून, शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गट, स्वतंत्र उमेदवार आणि नव्याने उदयास आलेले सामाजिक संघटनात्मक गट या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.या वेळी नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने इंदापूरमध्ये लढत अतिशय चुरशीची होणार आहे.

सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये उमेदवारीसाठी हालचाली जोरात सुरू आहेत. शहरातील राजकीय नकाशावर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष या दोन गटांचा प्रभाव राहिला आहे. मात्र, आता काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), मनसे, तसेच अपक्ष सामाजिक कार्यकर्तेही आपले अस्तित्व दाखविण्याच्या तयारीत आहेत.इंदापूर हे परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जाते.

मंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रभाव शहरात कायम असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, भाजप जोरदार तयारी सुरू आहे. विकास, पारदर्शकता आणि नव्या चेहर्‍यांवर विश्वास या भूमिकेतून भाजपची मोहिम सुरू होणार असल्याची चर्चा आहे.या निवडणुकीत युवक उमेदवार, व्यावसायिक आणि समाजसेवक वर्गातून नव्या चेहर्‍यांचे प्रवेशही होत आहेत.

राजकारणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणू या आश्वासनासह काही तरुण उमेदवार तयारीत आहेत. त्यामुळे जुन्या आणि नव्या नेतृत्वात स्पर्धा तीव्र होणार आहे.नगरपरिषद कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची आजपासून गर्दी वाढली आहे. दाखले, अनामत रक्कम आणि पडताळणीसाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असून, त्यानंतर उमेदवारांचे नशीब अर्जछाननीवर ठरणार आहे.

प्रमुख मुद्दे : पाणी, रस्ते आणि स्वच्छता
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या – पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीतील अडचणी हे मुख्य निवडणूक मुद्दे राहतील. शिवाय, स्मार्ट सिटीसारखा विकास आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येस अनुरूप नियोजन या बाबीवर प्रत्येक पक्ष आपला ब्लूप्रिंट सादर करणार आहे.

जनतेचा कल कोणाकडे ?
शहरात सध्या राजकीय चर्चांना वेग आला आहे. एका बाजूला अनुभवी नेतृत्वाचा प्रभाव, तर दुसर्‍या बाजूला नव्या पिढीचा आत्मविश्वास – या दोन घटकांमुळे इंदापूरची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे.प्रत्येक गल्लीतील पॅनेल आणि स्थानिक राजकीय समीकरणांवरच यावेळी निकाल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The post Indapur Politics : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहणार की भाजप गड जिंकणार? इंदापूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!