शिरूरच्या राजकारणात भूकंप! प्रकाश धारिवाल यांची निवडणुकीतून माघार, सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – शिरूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुकीत आघाडी उमेदवार न देणार असल्याची घोषणा केल्याने सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली आहेत आणि शहरात ‘त्रिकोणी राजकीय पोकळी’ निर्माण झाली आहे.

लोकशाही क्रांती आघाडीने दोन दिवसांपूर्वीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच, शिरूरचे लोकनेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनामुळे भाजपचेही महत्त्वाचे केंद्रबिंदू अनुपस्थित आहेत. या तीन प्रमुख शक्ती निवडणुकीत नसल्यामुळे शिरूरच्या राजकीय पटावर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील ‘आशीर्वाद’ निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत प्रकाश धारिवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आमचा व्यवसाय सातपेक्षा अधिक राज्यांत विस्तारलेला असल्याने आता पूर्णवेळ लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत सहभागी होणे शक्य नाही. ते पुढे म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा नाही. समाजकारण हीच माझी ओळख आहे.

धारिवाल यांच्या या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये निराशेची लाट उमटली. अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय शिरूरच्या हितासाठी पुन्हा विचारात घेण्याची विनंती केली आहे. गेल्या दोन दशकांत शिरूर पालिकेतील प्रमुख निर्णय धारिवाल यांच्या उपस्थितीत घेतले जात होते, त्यामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत.यामुळे आगामी निवडणूक अनिश्चितता, नवीन समीकरणे आणि खुले राजकारण घेऊन येणार आहे.

आघाडी नसल्याने उमेदवार कोणत्या गटात जाणार? नवीन नेतृत्व पुढे येणार का? शहर विकास आघाडीचे भविष्य काय? या प्रश्नांवर शहरभर चर्चा रंगल्या आहेत. पुढील काही दिवसांत धारिवाल यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने ते निर्णयाचा फेरविचार करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या बैठकीला माजी आमदार पोपटराव गावडे, अध्यक्ष सुभाष पवार, सचिव मनसूख गुगळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, काँग्रेस आयचे अध्यक्ष किरण आंबेकर, तसेच विविध पक्षांचे नेते व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निर्माण झालेली ‘त्रिकोणी पोकळी..
-शिरूर शहर विकास आघाडी – प्रकाश धारिवाल (माघार)
-लोकशाही क्रांती आघाडी – रवींद्र धनक (निवडणूक न लढवण्याचा निर्णय)
-भाजप – लोकनेते बाबुराव पाचर्णे (निधन)

The post शिरूरच्या राजकारणात भूकंप! प्रकाश धारिवाल यांची निवडणुकीतून माघार, सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!