
प्रभात वृत्तसेवा
पुणे : अमेडिया प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राज्यभर चर्चेत असताना आता पक्षातील पुण्यातील दोन महिला पदाधिकाऱ्यांतील वाद शिगेला पोहचला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नोटीस बजाविण्यात आली आहे. पाटील यांना सात दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी ही नोटीस बजावली असून, खुलासा न केल्यास पुढील कार्यवाही होईल, असे त्यात नमूद केले आहे. दरम्यान, पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे.
पाटील आणि चाकणकर या दोघी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) महिला पदाधिकारी असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दरम्यान वाद सुरू आहे. फलटण येथे महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यावरून पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
या नोटिशीची प्रत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात मारहाण केल्याची तक्रार माधवी खंडाळकर यांनी पोलिसांकडे दाखल केली होती. शनिवारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.
नोटीस नव्हे खुलासा पत्र..
पक्षाने नोटीस नाही तर खुलासा पत्र दिले आहे. त्यावर कायदेशीर उत्तर देणार असून सत्य बाजू मांडणार आहे. माधवी खंडाळकर यांनी केलेली तक्रार कोणाच्या सांगण्यावरून दिली याचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून कॉल डिटेल्स (सीडीआर) मागविणार आहे. याबाबत पक्ष प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपली बाजू मांडली आहे. त्यांनी पोलिसांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – ॲड. रूपाली पाटील ( प्रवक्त्या)
दोन दिवसात खुलासा..
या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही शनिवारी अजित पवारांची भेट घेतली.त्यानंतर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर होत असलेल्या आरोपांचा पुराव्यासह खुलासा करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
The post राष्ट्रावादीतील दोन रुपाली भिडल्या! रूपाली पाटलांना पक्षशिस्तभंगाची नोटीस, खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











