
शिरूर : श्री भैरवनाथ महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सविंदणे गावात बुधवारी (दि. ५) भाविकांच्या जयघोषात, वेदघोषात आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. आठ दिवस चालणारा हा सप्ताह यंदा अधिक आकर्षक आणि आध्यात्मिक वैभवाने नटलेला असून गुरुवारी (दि. १३) सकाळी होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने या भावसंपन्न सोहळ्याची भव्य सांगता होणार आहे.
सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण सविंदणे गाव भक्तिरसाने उजळून निघाले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेला भव्य मंडप, मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई, विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट, तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात बसवलेली चांदीची प्रभावळ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण परिसरात दिवसभर श्रद्धा, भक्ती आणि समाधानाचा भाव जाणवत आहे. अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिभावाने संपन्न होत असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
याशिवाय हरिपाठ, भजन, काकड आरती, हरिजागर, विना प्रहर असे विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने चालू आहेत. सप्ताहाच्या ठळक आकर्षणांमध्ये सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची भावपूर्ण कीर्तने असून भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व छबिना मंडळ यांच्या आयोजनाला भाविकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या वेळी मंदिर परिसर खचाखच भरलेला दिसत आहे.
जन्मोत्सव सप्ताहाची ख्याती वाढल्यामुळे यंदा शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध गावांतून हजारो भाविक दर्शनासाठी सविंदणे येथे दाखल होत आहेत. विशेषत:शनिवार-रविवारच्या दिवसांत भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांचे भव्य काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या कीर्तनाला हजारो भाविक उपस्थित राहतात. कीर्तनादरम्यान भक्तिगीते, ओव्या, प्रवचन आणि काल्याचा संदेश यामुळे वातावरण हरिनामाच्या गजरात रंगून जाते.
कीर्तनानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन असून भाविकांच्या सहभागाने सप्ताहाचा समारोप पारंपरिक उत्साहात होणार आहे. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांसाठी मंडळाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भोजनछावणीत शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी युवक मंडळे, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ सक्रिय आहेत.ग्रामस्थ, मंडळे आणि देवस्थान ट्रस्ट यांनी एकत्रितपणे केलेल्या नियोजनामुळे कार्यक्रमांची अखंडता आणि भक्तिमय वातावरण कायम राहिले आहे.
“दरवर्षी सप्ताह हा गावाची ओळख बनला आहे. यंदाही भैरवनाथ महाराजांच्या कृपेने सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या होत आहेत,” असे आयोजकांनी सांगितले. सविंदणे येथील अखंड हरिनाम सप्ताह हा श्रद्धा, भक्ती आणि सामुदायिक एकतेचे प्रतीक ठरत असून सांगता सोहळ्यादिवशी भाविकांचा भव्य सहभाग होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
The post Pune Gramin : सविंदणे येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











