Kothrud Fraud : 14 कोटींच्या फसवणुकीतील मुख्य आरोपींना पोलिसांनी कसं पकडलं? वाचा सविस्तर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शंकर महाराज अंगात येतात असा दावा करत, मुलींचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याची तब्बल १३ कोटी २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर कोथरूड पोलिसांत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी दीपक पुंडलिकराव डोळस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (दोघे रा. २२, कैलासदीप, महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (जय शंकर फार्म हाउस, नाशिक) यांच्यासह वेदिकाची आई आणि भाऊ (नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, भोंदू बाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना नाशिक येथून गुन्हे शाखेने अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक डोळस हे मूळचे पुण्यातील असून, इंग्लंडमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या दोन मुलींवर उपचारासाठी ते २०१० मध्ये भारतात परतले. डोळस यांची भजनी मंडळाच्या माध्यमातून २०१८ मध्ये दीपक खडकेशी ओळख झाली. खडकेने डोळस दांपत्याची वेदिका पंढरपूरकरची ओळख करून दिली.

ती ‘शंकर बाबांची लेक’ असून, तिच्या अंगात शंकर बाबा येतात, असे सांगून ती मुलींचे आजार बरे करेल, अशी खात्री या दाम्पत्याला देण्यात आली. वेदिकाने दांपत्याचा विश्वास संपादन करून मुलींचा आजार तुमच्या संपत्तीमुळे असून, ती विकल्यावरच त्या बऱ्या होतील, असे सांगितले. वेदिकेच्या सांगण्यावरून डोळस दांपत्याने इंग्लंडमधील ड्युप्लेक्स घर, फार्महाउस, कोकण आणि सासवडमधील शेतजमीन विकून सुमारे १३ कोटी २० लाख रुपये तिच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतरही मुलींच्या आरोग्यात सुधारणा न झाल्याने त्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे- अंनिस..
महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असून, या कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे दक्षता अधिकारी आहेत. आपल्या भागातील बुवांविरुद्ध ते गुन्हा नोंदवू शकतात. त्यांनी पुढाकार घेऊन अशी कार्यवाही केली, तर अशा घटनांना पायबंद बसू शकेल, असे अंनिसने पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोथरूडमधील घटनेतील महिला मांत्रिक आणि तिच्या साथीदारांविरुद्ध खटला दाखल करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. पीडित कुटुंबाला त्यांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी आहे, तसेच जादूटोणा विरोधी कायदा देशभर लागू करावा, अशीही मागणी आम्ही करत आहोत, असे अंनिसने पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

“या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. एफआयआर दाखल होताच एका रात्रीत तीन पथके तयार करून आरोपींना जेरबंद करण्यात आले.”
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

The post Kothrud Fraud : 14 कोटींच्या फसवणुकीतील मुख्य आरोपींना पोलिसांनी कसं पकडलं? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!