“आमचा कोणत्याही गुन्हेगाराशी संबंध नाही!”; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले..पण पार्थ पवारांच्या प्रश्नावर मौन

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आमचा कोणत्याही गुन्हेगाराशी संबंध नाही. भारतीय जनता पक्ष कधीही गुन्हेगारांना पाठबळ देत नाही, अशा शब्दांत भाजपचे मंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातील गुन्हेगारी आणि त्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर धाक निर्माण करावा, असेही त्यांनी सांगितले.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.

त्यानंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पाटील यांनी विविध आरोप, पोलीस यंत्रणा, तसेच कोथरूडमधील सुरक्षेच्या मुद्द्यांवर आपले मत मांडले.ते म्हणाले, मला दररोज हजारो लोक भेटतात. त्यापैकी काहींसोबत अनावधानाने फोटो घेतले जातात. त्यावरून कोणाशी संबंध जोडणे योग्य नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलवा. त्यांना अटक होत नसेल, तर दिवसभर बसवून ठेवा. मानसिक दबाव निर्माण करा. त्याचबरोबर पोलिसांनी सोशल मीडियावर सक्रिय राहावे आणि माध्यमांशी सातत्याने संवाद साधावा.

धंगेकरांवर थेट निशाणा..
नीलेश घायवळ आणि माझे संबंध असल्याचे पुरावे कोणाकडे आहेत? फक्त धंगेकर बोलतात. मी मंत्री असताना केलेले आरोप माझ्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत. माझ्या विरोधात एकही ठोस पुरावा नाही, तरीही माध्यमे बातम्या चालवतात, असे सांगून ते म्हणाले, धंगेकरांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी दिलेले पुरावे कुणी दाखवले नाहीत. माझ्यावर पुरावा नसताना चर्चा केली जाते. शहराची बदनामी करणे योग्य नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या संबंधावर ते म्हणाले, शिंदे माझे परममित्र आहेत. सर्व प्रश्न अशा प्रकारे सुटत नाहीत. अल्पवयीन आरोपींच्या वयोमर्यादेबाबत ते म्हणाले, गुन्हेगारीचे वय कमी करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. लवकरच आम्ही केंद्राला विनंती करू.

गुंडांची संपत्ती जप्त करा, ईडीला माहिती द्या..
गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक रसद कशी पुरविली जाते. त्यांना कशा प्रकारे पैसे मिळतात. गुंडांच्या बेकायदा गैरव्यवहारांबाबत ईडी, प्राप्तीकर विभागाद्वारे चाैकशी करावी. त्यांच्या बेनामी मालमत्त जप्त करा. याबाबत पोलिसांनी संबंधितांशी चर्चा करून उपाययोजना कराव्यात,असे आदेश पाटील यांनी दिले. शहरातील बांधकाम व्यावसायिकांसोबत पोलिसांनी बैठक आयोजित करावी, तसेच गुंड टोळ्यांच्या म्हाेरक्यांचे त्रास, खंडणी अशा प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांना योग्य सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

पार्थ प्रकरणी भाष्य टाळले..
पार्थ पवार यांच्या अमोडिया होल्डिंग्ज कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत पत्रकारांनी पाटील आणि मोहोळ यांना प्रश्न विचारला. त्यावर आम्ही शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे सांगून त्यांनी भाष्य करणे टाळले.

The post “आमचा कोणत्याही गुन्हेगाराशी संबंध नाही!”; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले..पण पार्थ पवारांच्या प्रश्नावर मौन appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!