सासवडचा नगराध्यक्ष कोण? शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या तयारीत, तर भाजप ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
सासवड – सासवड नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल अद्याप वाजलेला नसला तरी शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सज्ज केली असून, पोस्टरबाजी, सोशल मीडिया मोहिमा आणि जनसंपर्क दौर्‍यांनी शहराचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण आरक्षणात आल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

राजवर्धनी संजय जगताप, वामन जगताप, सचिन भोंगळे, अजित जगताप, साकेत जगताप आणि प्रदीप गिरमे ही नावे सध्या चर्चेत आहेत. काही उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी थेट संवाद साधला आहे, तर काहींनी अजूनही आपली राजकीय दिशा ठरवलेली नाही. जातीय आणि कौटुंबिक समीकरणे लक्षात घेता, नगराध्यक्षपदाची लढत बहुरंगी आणि चुरशीची होणार आहे.

सासवड नगरपरिषदेत 11 प्रभागांमधून 22 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात दोन जागांसाठी उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. मनोहर जगताप, मोहन जगताप, गुलाब जगताप, नीलम होले, मनीष रणपिसे, मंगेश भिंताडे, नवनाथ बोरावके, आनंद जगताप, शुभम जगताप, राजेंद्र टकले, अभिजीत कवितके, संदीप राऊत, सोनाली गिरमे, ललित बनकर, संतोष खोपडे, प्रतीक्षा जगताप, मुन्ना शिंदे यांसारखी अनेक नावे स्थानिक राजकारणात चर्चेत आहेत.

पुढील राजकीय दिशा सासवड ठरवणार!
10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याआधीच शहरात बॅनरबाजी, शक्तिप्रदर्शन आणि सोशल मीडिया मोहिमा सुरू झाल्या आहेत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, सासवडची ही निवडणूक केवळ नगरपरिषदेपुरती मर्यादित न राहता, पुरंदर तालुक्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा राजकीय नकाशा ठरवणारी ठरेल.

शिवसेना-राष्ट्रवादी युती चर्चेत..
सासवडमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार विजय शिवतारे आणि माजी नगराध्यक्ष गणेश निकुडे यांच्या समन्वयातून आघाडीची तयारी सुरू असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

महाविकास आघाडीकडून स्वतंत्र प्रयत्न..
काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतील पक्षांकडून स्वतंत्र बैठकींचे सत्र सुरू आहे. मात्र आघाडीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. स्थानिक स्तरावर हे गट वेगवेगळ्या पॅनेल्सच्या माध्यमातून मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे.

The post सासवडचा नगराध्यक्ष कोण? शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या तयारीत, तर भाजप ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!