Pune News : ’यशवंत’च्या जमीन व्यवहारात खोटी कागदपत्रे, 36 कोटी रुपये लाटले? राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर –
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 512 कोटी रुपये किमतीची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकून, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप व कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्यासह दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अत्यल्प किमतीला विक्री केली आहे. यासाठी त्यांनी शासनाकडे खोटी कागदपत्रे सादर करून 36 कोटी 50 लाख रुपयांचा अपहार केला आहे, असा आरोप करुन राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 44 व्यक्तीं विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

विकास लवांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याकडे हा तक्रार अर्ज दिला आहे. यावेळी राजेंद्र चौधरी, लोकेश कानकाटे, सागर गोते, अलंकार कांचन, सुर्यकांत काळभोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या तक्रार अर्जात पुढे असे म्हटले आहे की या सर्वांनी संगनमत करून 36 कोटी 50 लाख रुपये परस्पर बँक खात्यात वर्ग करून रक्कमेचा अपहार केला. गैरव्यवहार, दलाली करण्यासाठी मयत सभासदांना जिवंत असल्याचे भासविले.

बिगर सभासद आणि मयत व्यक्ति जमीन विक्री ठरावाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असल्याचा बनाव केला. त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन मयत व्यक्तींच्या खोट्या सह्या केल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे सभेचे इतिवृत्त तयार करुन सभासदांची व शासनाची फसवणूक केली आहे. संबंधितांवर पोलीस प्रशासनाकडून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

“विकास लवांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात झालेल्या अपहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.”
-राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर

सर्व आरोप बिनबुडाचे – जगताप
विकास लवांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्यामध्ये काडीमात्रसुद्धा तथ्य नाही. उलट 36 कोटी 50 लाख रुपये बँकांची थकीत देणी देऊन कारखान्याचा 105 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. 99.27 एकर जमिनीचा व्यवहार हा शासकीय नियमानुसार झाला आहे. लवांडे यांनी असली चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला यशवंत कारखाना कसा चालू होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आमची निष्ठा ही शेतकर्‍यांबरोबर असल्यामुळे हा सर्व व्यवहार पारदर्शकच आहे. त्यामुळे कुणी कितीही आरोप केले तरीही कारखाना चालू करणारच, असा दावा यशवंतचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केला.

The post Pune News : ’यशवंत’च्या जमीन व्यवहारात खोटी कागदपत्रे, 36 कोटी रुपये लाटले? राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!