Rajgad Politics : राजगड तालुक्यात इच्छुकांची भाऊगर्दी! राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
वेल्हे ( विलास बांदल ) –
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यासाठी काही कालावधी शिल्लक असताना दुर्गम व विकासापासून वंचित असलेला आणि राज्यातील सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या राजगड तालुक्यामध्ये सर्वत्र इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. एका एका पक्षात वेगवेगळ्या गटात व गणात मोठ्या प्रमाणात इच्छुक निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सर्वसामान्य मतदारांना विकास कामाची भरघोस आश्वासने देतानाच साखर पेरणी करण्यात गुंतले आहेत.

त्यामुळे या निवडणुकीत यावेळी रंगत पहायला मिळणार आहे. सर्वपक्षीय इच्छुक सर्व त्या मार्गाने मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. सोशल मीडियावर भावी सदस्यांचे बोर्ड झळकत आहेत.प्रत्येकाने आता नाही तर कधीच नाही अशी तयारी केली असून गाव भेट दौरे व कार्यकर्त्यांना जेवणावळी, सहली भाविकांना देवदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी विजय मिळवल्याने. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दहा हत्तीचे बळ आले आहे.

सर्वाधिक इच्छुकांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. तर, संग्राम थोपटे यांच्या पराभवानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तालुक्यातून काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच नाहीसे झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व स्थानिक नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सुद्धा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या बरोबर भाजपात प्रवेश केला. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाकडे ही इच्छुकांची संख्या अधिक आहे.

त्यामुळे घरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व भारतीय जनता पक्षामध्येच होण्याची दाट शक्यता असून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी केली असून यंदा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व भाजपामधील काही इच्छुकांना उमेदवारी नाही मिळाली तर, हे सगळे पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करू शकतात. मनसेने तर सर्वच मतदार संघात उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे.

लढती रंगतदार होणार..
तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट व तालुका पंचायत समितीचे चार गण, असे एकूण सहा मतदार संघ आहेत. यात विद्यमान राज्यकर्त्यांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली. त्यात सर्वाधिक काळ थोपटे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. भविष्यात चित्र बदलते की नाही हे पाहायला अजून वेळ जरी असला तरी निवडणूक मात्र रंगतदार होणार हे नक्की. जिल्हा परिषद गट विंझर-पानशेत सर्वसाधारण, वांगणी-वेल्हे नागरिकांचा मागास प्रवर्गपंचायत समिती गणात विंझर आणि वांगणी सर्वसाधारण तर पानशेत सर्वसाधारण महिला व वेल्हे बु. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, असे आरक्षण पडले आहे.

The post Rajgad Politics : राजगड तालुक्यात इच्छुकांची भाऊगर्दी! राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!